जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

रायसोनी नगर आणि पिंप्राळा परिसरातील घटना

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा, तर १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही प्रकरणांत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पहिली घटना रायसोनी नगर परिसरात घडली. येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान अचानक बेपत्ता झाला. अज्ञात व्यक्तीने त्याला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दुसरी घटना पिंप्राळा परिसरात घडली. येथील १९ वर्षीय तरुणी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली. तिचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमधील बेपत्ता मुलगा आणि तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.









