भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील शिवाजी नगर भागातील २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भूषण उल्हास वावरे (वय २१, रा. गोपाळ नगर, डी.एल. हिंदी विद्यालयामागे, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे आणि रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. मात्र, ही दुखापत नेमकी कशी झाली, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव

वॉटर पार्कजवळ एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.
भूषण या परिसरात नेमका कधी आणि कोणासोबत आला होता? त्याच्यासोबत काही घटना घडली होती का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









