जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा शहरात जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

दिनांक १९ एप्रिलच्या रात्री ९ ते २० एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान, चोपडा ते धरणगाव रोडवरील पाटचारी जवळ ही घटना घडली होती. संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) यांनी संगनमत करून प्रदिप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) याच्याशी असलेल्या पूर्व वैमनस्यातून त्याचा चेहरा व डोके ठेचून खून केला होता. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे समजले की, आरोपी मुंबईकडे पळाले आहेत. तातडीने एक पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, आरोपी मुंबईहून पुन्हा रेल्वेने जळगावकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी रणनीती बदलली. पोलीस पथकाने नाशिक येथून रेल्वेमध्ये प्रवेश केला आणि धावत्या रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शोध सुरू केला. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान संशयित विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
सुरवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, मयत प्रदिप महाजन याने आरोपी विजय वैदकर याला पूर्वी दिलेल्या त्रासाच्या रागातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.
ही कामगिरी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने (रविंद्र पाटील, दिपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिनवाडे, सुनील दामोदरे, रावसाहेब पाटील, रिजवान शेख) यशस्वीपणे पार पाडली.








