भुसावळ, (प्रतिनिधी) : दोन ग्राहकांच्या ऑनलाइन सौर ऊर्जा प्रणालीच्या मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (वय ४९, वर्ग-१) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (२२ जुलै) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे सोलर सिस्टीम बसवण्याची एजन्सी आहे. त्याअंतर्गत भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी सोलर सिस्टीम खरेदी केली होती. या दोन्ही प्रकरणांची मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळवण्यासाठी महावितरण भुसावळ शहर १ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले होते.

मात्र, काम प्रलंबित ठेवल्याने तक्रारदार यांनी २२ जुलै रोजी पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी दोन्ही प्रकरणांच्या मंजुरीसाठी नितीन पाटील यांनी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

प्राप्त तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, नितीन पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, संगीता पवार आणि बाळू मराठे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करत आहेत.








