जळगाव | दि. २९ जुलै २०२४ | येथील जिल्हा कारागृहात २०२१ साली चिन्या जगताप खून प्रकरणी दाखल खुनाच्या गुन्ह्यामध्ये जवळपास तीन वर्षांपासून फरार तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हा संशयित आरोपी सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला शरण आला आहे.
जिल्हा कारागृहामध्ये बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याला ठेवण्यात आले होते. तत्कालीन कारागृह अधीक्षक पेटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या आरोपींनी केलेल्या मारहाणीत जिल्हा कारागृहात ११ सप्टेंबर २०२० रोजी चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. २०२१ साली तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याच्यासह चौघांनी त्याला बेदम मारहाण करून खून केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील इतर चार संशयित आरोपी तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांना यापूर्वी अटक झाली आहे. तर सर्व पाचही जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे.
या प्रकरणांमध्ये फिर्यादीला अनेक वेळा न्यायालयात दाद मागावी लागली आहे. या प्रकरणात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हा फरार होता. दरम्यान आज सोमवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पेट्रस गायकवाड (रा. विद्यानगर, पुणे) हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला शरण आला आहे. त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अटकपूर्व तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.