जळगाव | दि.२९ जुलै २०२४ | तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगाव मध्ये शेततळे व इतर कामांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून “भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान” अशा घोषणा देत सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात आले.
शहरातील अधिक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी ‘होऊद्या दाखल गुन्हा.. आम्ही भ्रष्टाचार करू पुन्हा’ असे घोषवाक्य लिहलेल्या अभियंत्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला पुष्पहार, उदबत्ती लावण्यात येवून शेततळे कामात गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
शेततळे कामामध्ये गैरप्रकार करणारे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश देवूनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी, सुनील माळी, डॉ.संग्राम सुर्यवंशी, किरण राजपूत, चेतन पवार, आकाश हिवाळे, हितेश जावळे, योगेश साळी, सचिन साळुंखे, विनोद ढमाले, भल्ला तडवी, शैलेश अभंगे, खलील शेख, मतीन सैय्यद, ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.