जळगाव | दि.२९ जुलै २०२४ | महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात म्हटल्याप्रमाणे राज्य शासनाने महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळांचे भाडे व ठेव निर्धारणासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी न घेतल्यामुळे गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात गाळेधारकांच्या हिताचे अपेक्षित बदल करण्यात यावे, यासाठी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोर्याचे आ. किशोर पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे आज दि.२९ जुलै रोजी भेट घेतली व निवेदन देण्यात आले.
गाळेधारकांच्या हिताचे निर्णय घेण्यासंबंधी लवकरच मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन योग्य ते बदल करण्याची विनंती करतो, असे आ. किशोर पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, तेजस देपुरा आदी उपस्थित होते.