भडगाव, दि. २६ – तालुक्यातील कजगाव येथे चोरीचे सत्र सुरूच असून, पुन्हा एकदा चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडस करून तब्बल आठ लाख रुपये कीमतीचे जनरेटर चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील वाॅचमनला अचानक जाग आल्याने त्याने आरडाओरड केली व चोरटे तेथून पसार झाले.
अलिकडच्या काही दिवसांपासून गावात विविध ठिकाणांना चोरट्यांनी हैदोस मांडला आहे. महादेव मंदिर, ऋषीबाबा मंदिर, कालिका माता मंदिरावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली आहे. त्यातच कनाशी रस्त्यावरून काही दिवसांपूर्वी बैल जोडी चोरी झाल्याची घटना घडली होती तर त्याच रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील अडीच लाख रुपये किमतीची ताडपत्री चोरीला गेले होते. दहा दिवसातील ही कनाशी रस्त्यावरील तिसरी घटना असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
आता कनाशी रस्त्याजवळील कजगाव पारोळा रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामावरील जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने भामट्यांचा पाठलाग केला मात्र भामट्यांनी ट्रक्टर रस्त्यावरच सोडुन पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान पोलीस नाईक नरेंद्र विसपुते, हवालदार राजू सोनवणे, वाहनचालक संभाजी पाटील, ग्रामसुरुक्षा दलाचे योगेश चौधरी, प्रवीण महाजन, पहारेकरी रावसाहेब महाजन यांनी चोरट्यांना पाठलाग केला होता.
चोरीच्या ट्रक्टरचा वापर करून जनरेटर चोरीचा प्रयत्न..
मिळालेल्या माहिती नुसार जनरेटर चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर चोरीचे असल्याचे कळत आहे. सदरील ट्रॅक्टर हे दिनांक २० मे रोजी चाळीसगाव जवळून चोरीला गेले असल्याची फिर्यात ट्रक्टर मालकाने पोलीस स्टेशनमध्ये दिल्याचे कळते.