भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील बस स्थानकातून एसटी बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेची सव्वा तीन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास करणाऱ्या महिला आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. तिच्याकडून २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील रहिवासी कुसुम देविदास चौधरी (वय ६२) या २३ एप्रिल रोजी सकाळी भुसावळ बस स्थानकातून चोपडा बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरी केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पथकातील कर्मचारी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा करत असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे कुलसुम्बी मुश्ताक शेख (रा. यावल) या संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेली ३ लाख २० हजार रुपयांची सोन्याची पोत हस्तगत केली आहे. या यशस्वी कारवाईत डी.बी. पथकाचे विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अठाडे, दिलीप कोल्हे, जिवन कापडे, हर्षल महाजन आणि शिल्पा राठोड यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस नाईक कांतीलाल केदारे करत आहेत.








