जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मध्य प्रदेशातील एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. गोकुळ साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोरसर, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे जळगाव शहर व जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील चोरीचे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते २.२० वाजेदरम्यान बळीराम पेठेतील गोपाल स्टेशनरीसमोरील सार्वजनिक ठिकाणाहून फिर्यादीची काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक MH-19-EM-2330) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गोकुळ पाटील याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस खाक्या दाखवताच त्याने बळीराम पेठेतील दुचाकी चोरीची कबुली दिली. सखोल चौकशीत त्याने जळगाव शहरातून आणखी ८ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जळगाव शहर पोलीस ठाण्यातील ८ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण ९ गुन्ह्यांतील २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व शहर पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, अतुल वंजारी, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, रिजवान शेख तसेच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.









