पाचोरा, दि. ०२ – तालुक्यातील पिंप्री बुद्रूक येथे ८० वर्षीय वृध्द महिलेचा अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत खुन केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दरम्यान पाचोरा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन खुनाच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
पिंप्री ता. पाचोरा येथील रहिवासी तेजसबाई पुना जाधव या घरी एकट्याच राहत होत्या असतात दि.३१ रोजी सायंकाळी घराचे लाईट अद्याप का लागले नाही. अशी माहिती शेजाऱ्यांच्या वतीने गावातच राहत असलेल्या नातेवाईकांना कळविण्यात आली. दरम्यान आत बघितले असता, मयत तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करत खुन झाल्याचे लक्षात येताच याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर नगरदेवळा आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सारा घटनाक्रम वरिष्ठांना कळविल्यानंतर पोलीस प्रशासनातील सारेच वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दि.३१ मे च्या सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करत खुन करत विळा तेथेच सोडून पोबारा केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भारत काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलीस स्टेशनचे किसनराव पाटील उपस्थित होते. दरम्यान घटना स्थळी ठसे तज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक दाखल झाले असुन तपास कामी पथक तयार करून गुन्हेगारांचा शोध सुरू झाला आहे.