जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आरोग्य सेवेत आणखी एक आधुनिक टप्पा गाठत डॉ. उल्हास पाटील रूग्णालय आणि महादेव रूग्णालय येथे अत्याधुनिक कोब्लाटर मशीन उपलब्ध झाले आहे. नाक-कान-घसा विभागातील शस्त्रक्रियांना अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक बनविण्यासाठी ही तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
कोब्लेशन तंत्रज्ञानावर आधारित हे मशीन टॉन्सिल्स, अॅडेनॉइड्स तसेच इतर सॉफ्ट टिश्यू काढण्यासाठी वापरले जाते. पारंपरिक शस्त्रक्रियांपेक्षा या पद्धतीत अनेक फायदे मिळतात. ऑपरेशनदरम्यान रक्तस्राव अत्यल्प होतो, त्यामुळे रुग्णाची जोखीम कमी होते. तसेच ऑपरेशननंतर वेदना तुलनेने कमी जाणवतात, जखम लवकर भरून येते आणि रुग्णाची रिकव्हरी जलद होते. या तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आसपासच्या निरोगी टिश्यूला कमी नुकसान होते. त्यामुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढते आणि गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. परिणामी, रुग्णांना कमी कालावधीतच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, या आधुनिक यंत्रणेमुळे शस्त्रक्रिया अधिक प्रभावीपणे करता येणार असून, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. तरी नागरिकांनी व रुग्णांनी या अत्याधुनिक कोब्लाटर तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.








