श्रीनगर, विशेष प्रतिनिधी : कृषी अभियांत्रिकी, तांत्रिक नवोपक्रम आणि शाश्वत शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअर्स (आयएसएई) तर्फे जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. श्रीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात आयएसएईचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने वरिष्ठ सहकारी व कृषी अभियंता सोमनाथ जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला.

सूक्ष्मसिंचनापासून आधुनिक शेती तंत्रज्ञानापर्यंत विविध क्षेत्रांत जैन इरिगेशनने केलेल्या कामगिरीची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. प्रिसिजन फार्मिंग, संरक्षित शेती आणि हवामानपूरक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेती अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि शाश्वत बनविण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे.

ठिबक व तुषार सिंचन, फर्टिगेशन, हवामानपूरक कृषी उपाययोजना, हरितगृहे, प्रगत टिश्यू कल्चर लागवड साहित्य, सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन प्रणाली आणि आधुनिक जलव्यवस्थापन तंत्रज्ञान अशा विविध उपायांचा समावेश असलेली एकात्मिक कृषी तंत्रज्ञान प्रणाली जैन इरिगेशनने विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतीतील संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे.

‘मोअर क्रॉप पर ड्रॉप’ अर्थात कमी पाण्यात अधिक उत्पादन हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. या संकल्पनेनुसार पाणी आणि पोषक घटकांचा काटकसरीने वापर, पिकांची उत्पादकता वाढविणे, लागवडीचा खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक परतावा मिळवून देणे यावर कंपनीचा भर आहे. हरितगृह शेती, उच्च तंत्रज्ञानाधारित फलोत्पादन आणि शाश्वत कृषी पद्धतींच्या प्रसारातून संसाधनांचा योग्य वापर करणाऱ्या शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.
हवामानातील बदल आणि वाढती पाणीटंचाई या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जैन इरिगेशनची हवामानपूरक तंत्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. संशोधन, तांत्रिक नवोपक्रम आणि प्रत्यक्ष शेतातील अंमलबजावणी यांची सांगड घालत कृषी अभियांत्रिकी आणि शेतीतील प्रत्यक्ष गरजा यांच्यातील दरी कमी करण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे.
जैन इरिगेशनकडे ८०० हून अधिक तज्ज्ञ कृषी अभियंत्यांची समर्पित टीम असून, तंत्रज्ञान विकास, शेतकरी प्रशिक्षण आणि आधुनिक कृषी पद्धतींचा प्रसार करण्यात या टीमचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कृषी क्षेत्रातील या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मिळालेला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ हा कंपनीच्या तांत्रिक क्षमता आणि शाश्वत शेतीसाठीच्या प्रयत्नांचा गौरव मानला जात आहे.








