जळगाव I प्रतिनिधी : मंगलमूर्ती श्री गणरायाचे आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये थाटामाटात आगमन होत असून, संपूर्ण जळगाव जिल्हा गणेशोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात अत्यंत भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले.

जिल्ह्यात यंदा २ हजार ९९० गणेश मंडळांची अधिकृत नोंद झाली असून, त्यामध्ये २,१६४ सार्वजनिक तर ६५३ खासगी मंडळांचा समावेश आहे. एकट्या जळगाव शहरात ४०७ मंडळे बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असून, त्यातील २१६ सार्वजनिक मंडळे आहेत.

सजावट, रोषणाई आणि देखावे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग पराकोटीला पोहोचली होती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे सजावट आणि मूर्ती रक्षणासाठी मूर्तिकार व कार्यकर्त्यांची मोठी कसरत झाली. मात्र, या प्रतिकूल हवामानावर मात करत ताडपत्रीच्या साहाय्याने सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात आली.

जिल्ह्यात सामाजिक सलोखा वाढीस लागावा म्हणून तब्बल १७३ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवण्यात येत असून एमआयडीसी व तालुका हद्दीत १० ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे.
संपूर्ण उत्सव काळात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत सुमारे ५ हजार पोलिसांचा ताफा आणि २५०० हून अधिक होमगार्ड जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात आज गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे.








