पारोळा (प्रतिनिधी): पारोळा शहरातील गर्दीचा गैरफायदा घेऊन एका महिलेचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवणाऱ्या चोरट्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. गणेश करुण पवार (वय ४०, रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला बीड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले ६ लाख ११ हजार रुपये किमतीचे ४७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही घटना २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास पारोळा शहरातील लवण गल्ली परिसरातील महेंद्र फोटो स्टुडिओसमोर घडली होती. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने महिलेचे सोने चोरून नेल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या कडक सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सलग आठ दिवस तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कसून तपास करत पथकाने आरोपीचा माग काढला आणि बीड येथून संशयित गणेश पवार याला जेरबंद केले.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे चोरीला गेलेला सर्व ऐवज हस्तगत झाला असून पारोळा पोलिसांचे कौतुक होत आहे.








