वरणगाव, प्रतिनिधी : फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर रविवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी गोळीबाराची घटना घडल्याने वरणगाव परिसर हादरला. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी सरफराज सय्यद बशीर सय्यद (वय २५, रा. मुक्ताईनगर) याच्यावर प्रथम लोखंडी रॉडने वार केले. त्यानंतर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सरफराजच्या खांद्याला गोळी लागली असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून हल्ल्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

सरफराज हा भुसावळ येथील एक उद्योजकाकडे वाहनचालक म्हणून कामाला आहे. रविवारी काम संपवून तो दुचाकीने मुक्ताईनगर येथील घरी परतत होता. दरम्यान, त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर तो नेहमीच्या मार्गाऐवजी फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला अडविले.

हल्लेखोरांनी सरफराजच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्यानंतर गावठी कट्ट्यातून त्याच्या दिशेने दोन ते तीन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेला सरफराज रस्त्यावर कोसळला. हल्ल्यानंतर तिन्ही हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सरफराजला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
बायपास रस्त्यावर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पसार झालेल्या तिन्ही संशयितांचा शोध घेऊन त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.








