जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले.
या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये शरद तायडे यांना १७ मते, अनिल चौधरी यांना ११ मते तर रेश्मा काळे यांना १ मत मिळाले. याशिवाय ५ मते अवैध ठरली.
मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर नंदकिशोर महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली.
मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विजयी उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.







