जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, या उद्देशाने भाजप जिल्हा महानगरच्या वतीने गुरूवारी संध्याकाळी गोलाणी मार्केट येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली.
या महाआरतीचे विधिवत पूजन आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी प्रभू श्रीराम आणि श्री हनुमंताचा जयघोष कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षात महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन राज्यात पर्यायाने जळगावातदेखील विकासकामांसाठी पाठिंबा दिला. जनतेसाठी अनेक कामे मार्गी लागली. त्यामुळे वेगवान, पारदर्शक निर्णय घेऊन गतिमान प्रशासन चालविण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी प्रतिक्रियाही आ. भोळे यांनी दिली.
महाआरतीदरम्यान फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा उल्लेख करत आगामी काळात पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तर कार्यक्रमानंतर श्री हनुमान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून गेला होता.
यावेळी भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, विरेन खडके, राहुल वाघ, जयेश भावसार, अजित राणे, मनोज भांडारकर, भारती सोनवणे, भाग्यश्री चौधरी, चित्रा मालपाणी, मिलिंद चौधरी, दीप्ती चिरमाडे, नीलेश तायडे, गोपाल पोपटानी, सुनील सरोदे, शक्ती महाजन, संजय शिंपी, प्रमोद वाणी यांच्यासह जळगाव जिल्हा महानगर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.