चोपडा, प्रतिनिधी : चोपडा ग्रामीण पोलिसांनी शस्त्रविरोधी कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे, आठ जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात तीन लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे कट्टे आढळून आले. प्रत्येक कट्ट्याची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासोबत पिवळ्या धातूची आठ जिवंत काडतुसेही मिळून आली. या काडतुसांच्या मागील बाजूस इंग्रजीत ‘KP 7.65’ असे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.


संशयितांच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली. कट्टे, काडतुसे आणि मोटारसायकल असा जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील तिघे अटकेत
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शुभम पाटील यांच्या फिर्यादीवरून साहील दगडू आवारे (वय १९), सौरभ संतुराम मोतीरावे (वय २३, रा. पिंपरी-चिंचवड परिसर) आणि रोहित चंद्रकांत जुजगर (वय ३०, रा. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपी संगनमताने गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगून मोटारसायकलवरून त्यांची चोरटी वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ७/२५, भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), ३७(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनवणे करीत आहेत.








