जळगाव, प्रतिनिधी : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मुंबई WIRC विभागाच्या कार्यकारी मंडळाने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी जळगाव सीए शाखेला भेट दिली. यानिमित्त दिवसभर विविध उपक्रम, संवाद, मार्गदर्शनपर सत्रे, विद्यार्थ्यांचा सत्कार, पत्रकार परिषद तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मुंबई WIRC विभागाचे अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा, सेक्रेटरी सीए बिशान शाह, कोषाध्यक्ष सीए राकेश शाह, मुंबई सीए विद्यार्थी शाखेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, जळगाव सीए शाखेचे नॉमिनी आरसीएम सीए जितेंद्र सगलानी आणि आरसीएम सीए विजेंद्र जैन यांच्यासह मान्यवरांचे जळगाव सीए शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

यावेळी जळगाव सीए शाखेचे अध्यक्ष सीए रोशन रुणवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष सीए सोहन नेहेते, सेक्रेटरी सीए करण काबरा, कार्यकारी मंडळ सदस्य सीए लक्ष्मीकांत लाहोटी, सीए नचिकेत जाखेटीया, तत्काळ माजी अध्यक्ष सीए हितेश आगीवाल, संयुक्त सदस्य सीए तृप्ती राठी व सीए हितेश जैन यांच्यासह शाखेचे माजी अध्यक्ष आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सीए फायनल, सीए इंटरमिजिएट आणि सीए फाउंडेशन परीक्षेत यश मिळवून रँक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुंबई WIRC टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबई सीए विद्यार्थी शाखेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, कोषाध्यक्ष सीए राकेश शाह आणि सेक्रेटरी सीए बिशान शाह यांनी नव्याने पात्र ठरलेल्या सीएंचे अभिनंदन केले. बदलत्या काळानुसार सीएंनी स्वतःला अद्ययावत ठेवून उपलब्ध होणाऱ्या नवीन संधींचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. जळगाव सीए शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
मुंबई WIRC विभागाचे अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांमधील सीए सदस्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी, व्यावसायिक नेटवर्किंगसाठी आणि कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. जळगाव शाखेकडूनही सातत्याने उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आजचे युग झपाट्याने बदलत असून तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन कायद्यांमुळे व्यावसायिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी सीएंनी आपले ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे अजमेरा यांनी सांगितले.
यावेळी मुंबई WIRC समिती सदस्यांची जळगाव सीए शाखेच्या माजी अध्यक्षांसोबत चर्चात्मक बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत सीए सौरभ अजमेरा यांनी ICAIतर्फे सभासद आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सभासद व विद्यार्थ्यांसाठी एआय कोर्स, वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत जीएसटी, इन्कम टॅक्स आणि सायबर फ्रॉडबाबत मार्गदर्शन करण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सीए विद्यार्थ्यांना ICAIतर्फे शिष्यवृत्तीही दिली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई येथे दि. ४ व ५ डिसेंबर २०२६ रोजी सीए सभासदांसाठी प्रादेशिक परिषद, तर दि. ५ व ६ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय सीए विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक सीए सभासद आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या परिषदांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजमेरा यांनी केले.
मुंबई WIRC टीमतर्फे पांजरापोळ गौशाळेत ‘सामूहिक गौसेवा एक अनुष्ठान’ हा उपक्रम राबविण्यात आला. गौसेवाव्रती अॅड. विजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने गौसेवा केली. यावेळी वृक्षारोपणाचाही उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए अम्रिता मणियार आणि सीए मानसी कुळकर्णी यांनी केले. आभार सीए करण काबरा यांनी मानले.









