सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व व्यवस्थापनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची घेतली माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव मिळावा, उद्योगातील कार्यपद्धती आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (GIMR), जळगाव आणि डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रीम इंडस्ट्रीज, गाडेगाव येथे गुरुवारी (दि. ११) औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कंपनीतील विविध विभागांची पाहणी करून उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली. गुणवत्ता नियंत्रण विभागाचे जयदीप सिंग यांनी उत्पादनांची गुणवत्ता तपासणी तसेच गुणवत्ता नियंत्रणाच्या विविध प्रक्रियांबाबत मार्गदर्शन केले. पीव्हीसी विभागाचे प्रभारी गोपाल पांडे यांनी पीव्हीसी उत्पादन प्रक्रिया आणि त्यातील तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
उत्पादन लाइनचे अभियंता सुमित नारखेडे यांनी विविध यंत्रसामग्रीचे कार्य, उत्पादन लाइनची रचना आणि अभियांत्रिकी प्रक्रियेची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्पे प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळाली.
मानव संसाधन विभागाचे प्रमुख धनंजय जोहुरकर यांनी मानव संसाधन व्यवस्थापन, कंपनीतील कार्यसंस्कृती, औद्योगिक सुरक्षा तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुप्रीम इंडस्ट्रीजचे कार्यसंचालक गिरीराज सक्सेना यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कॉर्पोरेट क्षेत्रातील अपेक्षा, आवश्यक कौशल्ये आणि व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले.
औद्योगिक भेटीद्वारे विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, तांत्रिक कार्यपद्धती आणि व्यवस्थापनाच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळाला. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीत दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. भेटीचे समन्वयक म्हणून गोदावरी आयएमआरच्या इंडस्ट्रीयल व्हिजिट कोऑर्डिनेटर प्रा. रेणुका पोळ आणि डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेजच्या समन्वयक प्रा. मानसी अहिरे यांनी काम पाहिले.
फिजिकल डायरेक्टर चंद्रकांत डोंगरे, प्रा. शिवानी महाजन, प्रा. प्रशांत बाहेकर, प्रा. पूनम भरुडे आणि गणेश सरोदे यांनी सहकार्य केले. भेटीच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रशांत वारके यांचे मार्गदर्शन लाभले.








