जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभेचे माजी आमदार आणि ‘शिंगाड्यावाला शेतकरी नेता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय ‘सामाजिक पुरस्कार’ माजी आयकर सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांना, तर ‘राजकीय (पुरोगामी) पुरस्कार’ मिरा-भाईंदर मनपाचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना जाहीर झाला आहे.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ ऑगस्ट रोजी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा दोन दिवसीय सोहळा पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किरण पाटील, महेंद्र रामोशे आणि बापूराव ठाकरे उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळा २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या शमिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. लाल टोपी, बागायतदार रुमाल, रु. २१,००० रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

तसेच या कार्यक्रमाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत ‘मानवी बुद्धीला आव्हान: समजदारीचे की कृत्रिम बुद्धिमत्तेचे?’, ‘लोकशाहीचा वेध : प्रश्न विचारण्याची शक्ती की शांततेची सक्ती?’ यांसारख्या विविध वैचारिक विषयांचा समावेश आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु. ११,०००, रु. ९,००० व रु. ७,००० आणि रु. २,००० ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. प्रा. राजेंद्र देशमुख, बी. एन. चौधरी व प्रा. रमेश माने हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या वैचारिक सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








