धरणगाव, (प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे. विद्यार्थी वर्ग सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये अधिक व्यस्त असल्याने त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी धरणगाव तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात विशेष सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे व साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, डेटा चोरी, बनावट सोशल मीडिया खाती, फेक लिंक, ऑनलाइन गेमिंगमधील फ्रॉड आणि मोबाईल ॲप्स वापरताना होणाऱ्या धोक्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान हॅकरचा मुखवटा वापरून दाखवण्यात आलेले विशेष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या प्रात्यक्षिकातून हॅकर्स वैयक्तिक माहिती कशी मिळवतात, फसवणूक कशी करतात आणि आर्थिक नुकसान कसे पोहोचवतात, याचे वास्तव प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट झाले.

याशिवाय खेळ, प्रश्नमंजुषा आणि संवादात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या सहकार्याने आणि आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृती उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.









