एकाला अटक ; बदलापूर रेल्वेस्थानकावरील घटना
मुंबई (वृत्तसंस्था ) : रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये शौच करण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाने त्याच्याकडे 5 रुपये सुट्टे नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने शौचालयाच्या ठेकेदाराने आणि त्याच्या 15 वर्षीय मुलाने त्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून डोळ्याला गंभीर दुखापत केल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर असलेल्या शौचालयात घडली. याप्रकरणी पोलिसांनी योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय 47 ) याला अटक केली.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तक्रारदार विनायक बाविस्कर (वय 28) हे 19 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शौचालयाचमध्ये गेले होते. शौच करून बाहेर आल्यानंतर बाप-लेकानं विनायककडे 5 रुपयाची मागणी केली. मात्र विनायककडे सुट्टे 5 रुपये नसल्यानं त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी बाप-लेकानं मिळून विनायकला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अॅसिड फेकलं. या हल्ल्यात विनायकच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलाची बालसुधारगृहात रवानगी : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत बाप-लेकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर विनायक यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 चे कलम 124 (1) 352, 115(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे शौचालय चालक योगेशकुमार याला अटक केली. त्याच्या 15 वर्षीय मुलाची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली.