चाळीसगाव | दि.०६ ऑगस्ट २०२४ | तालुक्यात वनविभागाच्या क्षेत्रातील जुनपाणी शिवारात बिबट मादी सोमवारी सकाळी ११ वाजता मृतावस्थेत आढळून आली. वन्यप्राण्यांच्या एकमेकांवरील हल्ल्यात बिबट मादीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पशुवैद्यकीय विभागाने वर्तवली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी घटनास्थळी पशुवैद्यकीय टीमला बोलावून शवविच्छेदनासह अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.
जुनपाणी शिवारात गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांना बिबट्या मादी मृत झाल्याचे दिसून आले. सोमवारी दुपारी मृत बिबट्या मादीवर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, सहायक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. शीतल पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश मंत्री आदी उपस्थित होते.
मृत बिबट मादी अडीच ते तीन वर्षांची होती. तिच्या मानेवर जखमा आढळून आल्या होत्या. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला असावा. तिचे नखे व इतर अवयव सुरक्षित होते. घातपाताच्या खुणा दिसून आल्या नाही. बिबट मादी १२ ते १८ तासांपूर्वी मृत पावली असावी, अशी शक्यताही पशुधन विकास अधिकारी डॉ. मेहुल राठोड यांनी व्यक्त केली.