जळगाव | दि.२५ जुलै २०२४ | ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले पाहिजे हे डोळसपणे बघावे लागते. बुध्दिबळ हा खेळ सुद्धा आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवितो. आत्मचिंतन करुन भविष्यातील लढाईची रणनिती आखण्यासाठी मदत करतो. सृजनशील विचारांना चालना बुध्दिबळ खेळातून मिळते.’ असे मार्गदर्शन माजी आमदार मधु जैन यांनी केले.
एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे आज (दि. २५) पासून २८ जुलै २०२४ दरम्यान केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अध्यक्ष म्हणून माजी आमदार मधु जैन बोलत होत्या. यावेळी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, सचिव नंदलाल गादिया, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसिडेंट-मिडीया अनिल जोशी, चिफ ऑरबिटर गौतम रे उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. मधु जैन आणि रविंद्र नाईक यांनी बुध्दिबळ पटावर चाल करुन स्पर्धेला सुरवात केली.
नंदलाल गादिया यांनी जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनने राबवित असलेल्या उपक्रमांविषयी प्रास्ताविकात सांगितले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सानिया तडवी व आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
जैन इरीगेशन सिस्टीम्स लि, जैन स्पोर्ट्स अकॅडमी व खान्देश सेंट्रल यांच्या सहकार्यातून झालेल्या राज्य वरिष्ठ खुल्या गटासाठी राज्यातून १६२ बुद्धिबळ पटूंनी सहभाग घेतला. स्विस लिग पध्दतीने खेळल्या गेल्या या स्पर्धेत आज दोन डाव खेळले गेले. सोलापूरची सृश्रीती विकास मोरे या अंध खेळाडूंने सहभाग घेऊन सर्वांची मने जिंकली. तर जळगावचा कबीर श्रीकांत तडवी या सहा वर्षाच्या चिमूकल्याने सौ. मधुभाभी जैन यांच्या वजरीला मागे घेण्यास भाग पाडले. ७३ वर्षाचे वयस्क खेळाडूंनी आपला अनुभव अजमावला.
जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शकील देशपांडे, सहसचिव चंद्रशेखर देशमुख, कार्यकारणी सदस्य तेजस तायडे, रविंद्र दशपुत्रे, विवेक दाणी आदी उपस्थित होते. बुध्दिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे, जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकारी यावेळी उपस्थित होते. अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर देशमूख यांनी आभार मानले.