गजानन पाटील | अमळनेर, दि.29 – महाराष्ट्रात उत्कृष्ट पोलीस स्टेशनचे पारितोषिक मिळवणारे मारवड, ता. अमळनेर येथील एपीआय राहुल फुला यांची बदली नुकतीच पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली आहे. दरम्यान मारवड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढत अनोख्या पद्धतीने निरोप दिला.
सर्वसाधारणपणे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात फारसे पटत नसते. परंतु काही माणसे त्यांच्या कामाच्या वेगळ्या कार्यशैली मुळे अनेकांना आपलेसे करतात. नेमकी हीच काम करून घेण्याची लकब एपीआय राहुल फुला यांच्याकडे असावी म्हणून त्यांच्याच पोलिस ठाण्यातील सहकार्यानी आपल्या साहेबांची चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढत अविस्मरणीय निरोप दिला.
एपीआय राहुल फुला यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि सामान्य जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात देखील अमळनेर ग्रामीणला अनेकांना सामंजस्य व आपुलकीने समज देत वातावरण नेहमी हसत-खेळत ठेवले होते. म्हणूनच त्यांची बदली होताच कर्मचाऱ्यांनी त्यांची घोड्यावर मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव केला.
मारवड पोलीस स्टेशनला एपीआय राहुल फुला यांच्या जागी आता शहादा येथून नव्याने एपीआय जयेश खलाणे यांनी पदभार घेतला आहे.