लालसिंग पाटील | भडगाव, दि. १४ – तालुक्यातील कजगाव येथे चोरट्यांनी चोरीचा सपाटाच लावला आहे. दोन मंदिरातील चोरी पाठोपाठ नव्वद हजाराचे दोन बैल चोरट्यांनी चोरून नेले असल्याचा प्रकार समोर आलायं. सदर घटनेमुळे ग्रामस्थासह शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठवड्यात कजगाव वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी जीन या भागातील महादेव मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील काही साहित्य चोरत पोबारा केला होता. यानंतर कजगाव चाळीसगांव मार्गावरील ऋषीबाबा मंदिरातून देखील साहित्य चोरत पोबारा केला होता. लागोपाठ दोन दिवसात दोन मंदिरात चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. मंदिर चोरी ची चर्चा थांबत नाही तोच कजगाव पारोळा मार्गावरील विजय कौतिक महाजन यांच्या शेतात शेड मध्ये बांधलेली बैलजोडी अंदाजे नव्वद हजार रुपये किंमतीची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
दरम्यान शेड मध्ये एक गाय व एक वासरी बांधलेली होती मात्र ते तेथेच सोडत बैलजोडी चोरत चोरट्यांनी पोबारा केला. सदर घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त सुरू करावी. तसेच कजगावच्या पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.