जळगाव, दि.०६ – जलतरण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गरीब व होतकरू जलतरणपटूंना भरीव मदत करण्याच्या दृष्टीने येथील लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनी आणि जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि.१७ एप्रिल रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वर्गीय पी.व्ही.माळी यांच्या स्मरणार्थ या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदरील स्पर्धा जळगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस जलतरण तलाव याठिकाणी होणार असून, सहा निवडक क्रीडापटूंना पुढील प्रशिक्षणासाठी दत्तक घेणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान या स्पर्धेची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीचे अनिल माळी, प्रशिक्षक कमलेश नगरकर, अमित माळी, संघपाल तायडे, प्रचिती मिडीयाचे सचिन घुगे आदी उपस्थित होते.
स्वर्गीय पी.व्ही.माळी यांनी जलतरण प्रकार तसेच विविध नामांकित जलतरणपटू घडविले असून सुमारे तीस-बत्तीस वर्षांपूर्वी जळगावात प्रोफेशनल स्विमिंग रुजविणारे ते जळगावातील पहिले प्रशिक्षक होते. १९९४ साली जळगावात पहिल्यांदा माळीदादा यांच्या नेतृत्वात राज्य नामांकन जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती.
त्याच बरोबर जळगाव शहरातील मेहरूण येथील कै.कोकीळ गुरुजी जलतरण उभारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. जळगावातील होतकरू क्रिडापटूंसाठी जैन इरिगेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांसाठी त्यांनी वेळोवेळी मदतही उपलब्ध करून दिली. जळगावात खेळाडू साठी प्रथमतः दत्तक योजनेचे संकल्पना त्यांनीच आणली. शहरात अनेक जलतरणपटू माळीदादांनी घडविले आहेत ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भरीव कामगिरीची चमक दाखविली.
सदर स्पर्धा ५ वेगवेगळ्या गटात घेतल्या जाणार असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे..
०१) गट – १- (स्त्री व पुरुष) – फ्री स्टाईल ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक- ५० मी.
०२) गट – २ – (मुले व मुली वय -१५ ते १७ वर्षे) – फ्री स्टाईल ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक – ५० मी. तसेच फ्री स्टाईल मिक्स रिले ४ दाय ५० मी .
०३) गट ३ ( मुले व मुली वय १२ ते १४ वर्षे ) फ्री स्टाईल ५० मी . बेस्ट स्ट्रोक ५० मी . तसेच फ्री स्टाईल मिक्स रिले ४ बाय ५० मी.
०४) गट — ४ (मुले व मुली वय — ११ ते १० वर्षे) फ्री स्टाईल ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक – ५० मी. तसेच फ्री स्टाईल मिक्स रिले ४० बाय ५० मी.
०५) गट – ५ (९ वर्षांखालील मुले मुली) फ्री स्टाईल २५ मी. ब्रेस्ट स्ट्रोक – २५ मी.
तसेच फ्री स्टाईल मिक्स रिले अशा विविध वयोगटात घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून प्रवेश पूर्णतः मोफत असणार आहे. सहभागी जलतरणपटूंना टी- शर्ट, सर्टिफिकेट, ब्रेकफास्ट व लंच इत्यादी मोफत दिले जाणार आहे. तर विजेत्यांना मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ एप्रिल हि अंतिम दिनांक असून स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती तसेच प्रवेशासाठी कमलेश नगरकर मो.क्र. ९४२३४९१८०८. व गायत्री येरपाल मो.क्र. ७३९७८०३५७७ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.