रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आणि अन्नदानासह विविध लोकोपयोगी उपक्रमांचा धडाका
जळगाव, (प्रतिनिधी) : शहराचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपला परिवार मानणारे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचा वाढदिवस आज, १३ जून रोजी मोठ्या उत्साहात परंतु अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधत संपूर्ण जळगाव शहरात ‘जनसेवा आणि लोकहित’ या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपच्या ५ वेगवेगळ्या मंडळांमध्ये रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, अन्नदान, शालेय साहित्य वाटप, कामगार महिलांना साड्या वाटप आणि गो-सेवा असे भरगच्च कार्यक्रम राबवून हा दिवस खऱ्या अर्थाने सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
शहरात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमांचा धडाका..
आमदार भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांची लगबग सुरू होती. महापौर दीपमाला काळे यांच्या वतीने शाहूनगर येथील गोशाळेमध्ये गाईंना चारा वाटप करण्यात आले. तसेच पांझरापोळ गोशाळेत गाईंना लापशी व चारा देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंडळ क्रमांक ३ मध्ये जितेंद्र चव्हाण यांच्यातर्फे स्वामी समर्थ केंद्र (शारदाश्रम) येथे, तर शिवाजीनगर भागात माजी नगरसेवक राजेंद्र मराठे व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण करण्यात आले. जुने जळगाव भागात भाजप चिटणीस मिलिंद चौधरी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
गरजू व वंचितांना मदतीचा हात..
सकाळी ११ वाजता जिल्हा महानगराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले, तसेच रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष अजित राणे यांच्या वतीने संत गाडगेबाबा निराधार केंद्र (भजगल्ली) येथे ७० महिला व पुरुषांना भोजन देण्यात आले. शासकीय निरीक्षण गृहातील लहान मुलांना नगरसेविका अंकिता पाटील यांच्या वतीने जेवण देण्यात आले, तर भाजप कार्यकर्ते चेतन तिवारी व राहुल लोखंडे यांच्या वतीने विद्यार्थिनींना कपडे वाटप करण्यात आले.
दुपारी १२:३० वाजता प्रभाग क्रमांक १६ मधील दत्त मंदिर (सद्गुरु नगर) येथे स्थानिक नगरसेवकांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीतू परदेशी यांच्या वतीने कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तर नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या वतीने सिंधी कॉलनी सेवा मंडळासमोर प्रभागातील नागरिकांसाठी ‘आयुष्यमान कार्ड’ नोंदणीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पुष्पगुच्छ, बॅनर नको; विद्यार्थ्यांना वह्या द्या : आमदार भोळे यांचे आवाहन
दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांच्या वतीने कार्यकर्त्यांना एक अनोखे आवाहन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त कोणतीही जाहिरातबाजी किंवा महागडे फ्लेक्स-बॅनर न लावता, २१ जून रोजी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना भव्य वह्या वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पुष्पगुच्छांऐवजी जास्तीत जास्त वह्या जमा कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. या वह्या भाजप कार्यालय ‘जी. एम. फाउंडेशन’ येथे चिटणीस मिलिंद चौधरी यांच्याकडे जमा कराव्यात, असे कळविण्यात आले आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती..
आज दिवसभर झालेल्या या विविध कार्यक्रमांना भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नितीन लड्डा, प्रकाश बालानी, माजी महापौर सीमा भोळे, माजी अध्यक्षा उज्वला बेंडाळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भारती सोनवणे, राहुल वाघ, जयेश भावसार, नितीन इंगळे यांच्यासह अनेक नगरसेवक, भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







