रावेर, प्रतिनिधी : येथील एसटी आगारात डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून डिझेल विभागातील महिला लिपिकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिलेने आगारातील डिझेल पंपातून अनेकवेळा डिझेल काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

रावेर आगारातील डिझेल विभागाची जबाबदारी संबंधित महिला लिपिकेकडे होती. मागील महिनाभरात डिझेल पंपातून कधी ४० लिटर तर कधी ९० लिटर डिझेल काढून ते पुन्हा आगाराच्या डिझेल टाकीतच टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्याची माहिती आहे. या प्रकाराची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे, डिझेल बाहेर विक्री केल्याचे अद्याप समोर आलेले नाही. डिझेल पंपातून इंधन काढून ते पुन्हा त्याच टाकीत टाकण्यामागील नेमका उद्देश काय होता, याबाबत मात्र स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे या प्रकारामागील कारणांचा तपास होणे आवश्यक असल्याची चर्चा आगारात सुरू आहे.

दरम्यान, आगारातील बसगाड्यांचे प्रतिकिलोमीटर डिझेल मायलेज कमी दाखविण्यासाठी असा प्रकार करण्यात आला असावा, अशी चर्चा आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही.
यासंदर्भात आगार व्यवस्थापक किशोर मगरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी ही बाब गोपनीय स्वरूपाची असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला. एका कर्मचाऱ्यावर डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृत माहिती समोर न आल्याने आगारातील डिझेल व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.









