जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. नंदगावजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या डंपरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली. डंपरसह वाळू असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली.

या प्रकरणी डंपर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दीपक चौधरी करीत आहेत. गुलाब बाबा टेकडीजवळ वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

दरम्यान, शहरातील शंभर फुटी रोडवरील गुलाब बाबा टेकडीजवळ अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एमएच १९ बीजी ०६४४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी नंदकिशोर हरी भोई (वय ३५, रा. भोईवाडा, खंडेरावनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरूच असून, नदीपात्रातून तसेच शहर परिसरातून होणाऱ्या बेकायदा वाहतुकीवर पोलिसांची नजर आहे.









