जळगाव, प्रतिनिधी : श्रम साधना बॉम्बे ट्रस्टतर्फे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, २० डिसेंबर रोजी जळगावात एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नावनोंदणीला व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते सुरुवात झाली. यंदाची स्पर्धा ‘जळगाव रन्स फॉर फार्मर्स’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना समर्पित असून, त्यातून मिळणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीसाठी दिला जाणार आहे.

खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावरून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत २१, १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा चार श्रेणी असतील. प्रवेश शुल्क अनुक्रमे ९००, ७००, ५०० आणि ३५० रुपये असून, एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. १० आणि २१ किलोमीटरच्या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार ५०० आणि ५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक सहभागी धावपटूला टी-शर्ट, पदक, प्रमाणपत्र आणि नाश्ता दिला जाईल. नावनोंदणी www\.konfhub.com या संकेतस्थळावर तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येईल.

यावेळी स्पर्धेचे समन्वयक डॉ. एम. व्ही. रावलानी, डॉ. प्रदीप एम. सोलंकी, रेस डायरेक्टर प्रा. प्रवीण पाटील, डॉ. दिनेश पुरी, डॉ. एस. बी. पवार, डॉ. अमोल लांडगे, डॉ. किरण पाटील, डॉ. पंकज पुनासे, एस. आर. गिरासे, जयदेवसिंग रावल, भागवत पाटील, वीरेंद्र मोरे, जे. बी. शिसोदिया आणि जितेंद्र पाटील उपस्थित होते.









