जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या पात्र नवीन, विस्तारीकरण आणि विविधीकरण उद्योग घटकांना आता विदर्भ व मराठवाडा क्षेत्राप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहने मिळणार आहेत. उद्योग, गुंतवणूक, सेवा व खनिकर्म विभागाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

जळगाव जिल्ह्याचा औद्योगिकदृष्ट्या विकसित भागांशी असलेला असमतोल दूर करून स्थानिक उद्योगांना अधिक प्रोत्साहने मिळावीत, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. याच अनुषंगाने त्यांनी उद्योगमंत्र्यांना पत्र देऊन संपूर्ण जळगाव जिल्ह्याला घोषित करण्यात आलेल्या ‘डी प्लस’ दर्जाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. अखेर राज्य शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयानुसार, जळगाव जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे, विशेष मोठे, विशाल आणि अतिविशाल उद्योग घटकांना नवीन सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव व धुळे या वर्गीकृत क्षेत्रांप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहनांचे लाभ अनुज्ञेय राहणार आहेत.
या योजनेचा लाभ नवीन उद्योगांसह विद्यमान उद्योगांच्या विस्तारीकरण आणि विविधीकरणासाठीही मिळणार आहे. मात्र, संबंधित उद्योगांनी गुंतवणूक व रोजगारनिर्मितीचे निर्धारित निकष पूर्ण करणे आवश्यक असून, हे लाभ योजनेतील अटी व शर्तींच्या अधीन राहणार आहेत.
या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योगांची स्थापना करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळेल. विद्यमान उद्योगांना विस्तार करण्याची संधी उपलब्ध होईल, तसेच औद्योगिक गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत होणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, स्थानिक उद्योजक आणि नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
औद्योगिक क्षेत्राला मिळणाऱ्या या प्रोत्साहनांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्याला केवळ औद्योगिक दर्जाची घोषणा नको, तर प्रत्यक्षात औद्योगिक प्रोत्साहनांचे लाभ मिळावेत, अशी ठाम भूमिका आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मांडली होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. या प्रयत्नांना अखेर शासन निर्णयाच्या माध्यमातून यश मिळाले आहे.
या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल आणि जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला.
जळगावच्या औद्योगिक विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळण्याबरोबरच गुंतवणूक, उद्योगविस्तार आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी नवे पर्व सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.








