जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरात १२ वर्षीय शाळकरी मुलाने घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. रोहित राहुल चौधरी (वय १२, मूळ रा. लक्ष्मीनगर, जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने इतक्या लहान वयात हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रोहित हा भुसावळ येथील एका हॉस्टेलमध्ये राहून तेथील शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो जळगाव येथील आपल्या घरी आला होता. त्याच्या वडिलांनी शहरातील खडके चाळ परिसरात नुकतेच नवीन घर घेतले होते. याच नव्या घरात ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री रोहितने ‘मी नव्या घरात झोपायला जातो,’ असे सांगून खडके चाळ येथील नव्या घराकडे गेला होता. त्यानंतर शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याची आई रूपाली या नव्या घरात गेल्या. त्यावेळी रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. रोहितने एवढ्या कमी वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास सुरू असून त्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.









