चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडती गावात रविवारी सकाळी एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. वडती गावात एका नराधम पित्याने झोपेत असलेल्या स्वतःच्याच दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात १३ वर्षीय चिमुकलीचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला, तर ११ वर्षांचा लहानगा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा सुभाष भिलाला (वय १३) असे मृत मुलीचे नाव असून, रामु सुभाष भिलाला (वय ११) हा मुलगा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना, संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) याने धारदार कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार केले. हल्ल्याच्या तीव्रतेमुळे मीराचा जागीच प्राण गेला, तर रामु रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

घटनेनंतर आरोपी पिता जंगलाच्या दिशेने फरार झाला होता. या थरारानंतर परिसरात खळबळ उडाली असून अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवत जंगलात शोधमोहीम राबवली आणि संशयित आरोपी सुभाष भिलाला याला ताब्यात घेतले.

बापाने स्वतःच्याच पोटच्या गोळ्यांवर असा भयंकर हल्ला का केला, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक आजारपण की अन्य काही कारण, या सर्व शक्यतांचा पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे जप्त केले असून, आरोपीविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.








