चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरून नेणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करत मोठी कामगिरी केली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण बाळासाहेब तिकांडे (४६, रा. शिंदी, ता. चाळीसगाव) हे खराडी शिवारात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. आवाजाने जागे झालेल्या फिर्यादींनी चोरट्यांचा पाठलाग केला. हिरापूर येथे चोरट्यांना गाठले असता, त्यांनी बकऱ्यांनी भरलेली ग्रे रंगाची कार (एमएच ०१एनए ५५८) तिथेच सोडून पळ काढला. या वाहनात एकूण ८ शेळ्या सापडल्या, त्यापैकी तीन शेळ्या नारायण तिकांडे यांच्या होत्या. याप्रकरणी तिकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत या गुन्ह्यातील शांताराम उर्फ जिभ्या सुकलाल गायकवाड (२९, रा. पिंपरखेड, ता. भडगाव), अमोल महादु मालचे (२२, रा. यशवंत नगर, भडगाव) आणि सुनील बापू देवरे (भील) (२३, रा. लोणी सीम, ता. पारोळा) यांना शोधून अटक केली. चौकशीदरम्यान, या तिघांनी चाळीसगाव तालुका आणि जवळपासच्या परिसरात तसेच जळगाव, धुळे, मालेगाव, नंदुरबार, संभाजीनगर ग्रामीण परिसरातही अशाच प्रकारे बकऱ्या चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि कुणाल चव्हाण, पोउनि राहुल राजपूत, सहा.पोउपनि युवराज नाईक, पो.हे.कॉ. रवींद्र रावते, पो.हे.कॉ. प्रवीण संगेले, पो.हे.कॉ. नितीन सोनवणे, पो.हे.कॉ. संदीप पाटील, पो.हे.कॉ. अकरम बेग, पो.ना. भगवान माळी, पो.कॉ. सुनील पाटील, पो.कॉ. प्रदीप पवार यांनी ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास पो.ना. भगवान माळी करत आहेत.