नशिराबाद, दि.01 – येथील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्यावर नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासक यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस किंवा मिठाई वाटप करण्यासंदर्भात सकारात्मकता न दाखवल्यामुळे, गावातील शिव सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल 100 कर्मचाऱ्यांना मिठाई व फरसाण वाटप करण्यात येणार आहे. यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आभार मानले.

गेल्या काही महिन्यापासून नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्यात आले. यात नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या 90 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना यंदा पहिल्यांदाच नगरपरिषदेच्या वतीने दिवाळी बोनस किंवा मिठाईचे सुद्धा वाटप केले जाणार नसल्याने गावातील शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी गरीब व गरजू अशा सर्व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, याकरिता शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने कर्मचाऱ्यांना मंगळवारी दिवाळी सणानिमित्त फरसाण व मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिककांची उपस्थिती राहणार आहे. यंदा दिवाळीनिमित्त फरसाण व मिठाईचे वाटप शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश चव्हाण यांच्या पुढाकारातून करण्यात येत असल्याने कर्मचारी त्यांचे आभार व्यक्त करीत आहे.










