२८ लाखांच्या चोरीचा तीन दिवसांत लागला उघडा
जळगाव, (प्रतिनिधी) : लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेलेले अनिल हरी बराटे (वय ६४, रा. शिवशक्ती कॉलनी, भुसावळ) यांच्या घरी लोखंडी खिडकी तोडून भरदिवसा २८ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने काही दिवसांपूर्वी लांबवला होता. याप्रकरणी बर्हाटे यांचा जावायाने चोरी केली असल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.
राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी ता. भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी भुसावळ शहरातील शिवशक्ती कॉलनी परिसरात राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घराची मागील लोखंडी खिडकी तोडून घरातील ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख २ लाख ६० हजार रुपये रोख असा एकुण २८ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पोलिस तपासात फिर्यादीच्या जावयानेच ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. तो कर्जबाजारी असल्याचे समोर आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेतले असता, त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरीच्या मुद्देमाला पैकी २३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २१ लाख रुपयांचा मुद्देमाल त्याने काढून दिला.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोलिस नाईक सोपान पाटील, पो.कॉ. प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा आदींच्या पथकाने या गुन्हा उघडकीस आणण्याच्या कामगिरीत सहभाग घेतला.