सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

११ दिवसांपासून दर घसरत असल्याने ग्राहकांना दिलासा

जळगाव, प्रतिनिधी : सोने-चांदीच्या दरातील घसरण सलग सुरू असून, शनिवारी (२१ नोव्हेंबर) चांदीच्या दरात प्रतिकिलो ३ हजार रुपयांची, तर सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार ३०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा दर १ लाख ५३ हजार रुपये प्रतिकिलो, तर सोन्याचा दर १ लाख २४ हजार रुपये प्रतितोळ्यावर आला आहे.
गेल्या ११ दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चांदीच्या दरात ९ हजार रुपयांची मोठी घट होऊन तो १ लाख ५६ हजार रुपये प्रतिकिलोवर आला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा ३ हजार रुपयांची घसरण झाली.
सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर ५ हजार ७०० रुपयांनी घसरून १ लाख २५ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आला होता. शनिवारी त्यात आणखी १ हजार ३०० रुपयांची घट झाल्याने सोने १ लाख २४ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले.








