जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमधील सुमारे ३० पुरुष व २५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली.

पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत सेबर, एपी आणि फॉइल या तीन प्रकारांत चुरशीचे सामने रंगले. उद्घाटनप्रसंगी इ अँड टे विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), प्रा. मुकुंद शिरसाठ, प्रा. मनोज राठोड आणि एनआयएस फेन्सिंग प्रशिक्षक पायल मोरकर विविध विभागांचे प्रमुख तसेच प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी डॉ. हेमंत इंगळे यांनी खेळातून केवळ पदके किंवा विजय मिळत नाही, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

सेबर पुरुष गटात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तेजस पाटील सुवर्णपदक महिला गटात सायली पाटील सुवर्णपदक, साक्षी उबाळे कांस्यपदक मिळविले. एपी पुरुष गटात सिद्धांत विधाते (डॉ. व्ही. के. पाटील सीओईटी, छत्रपती संभाजीनगर) सुवर्णपदक, तर गोदावरीच्या मयूर कोळी रौप्यपदक पटकावले. एपी महिला गटात गोदावरीच्या वैष्णवी साबळे रौप्यपदक मिळविले. फॉइल पुरुष गटात सिद्धार्थ विधाते सुवर्णपदक, तर गोदावरीच्या तुषार पाटील कांस्यपदक पटकावले. फॉइल महिला गटात गोदावरीच्या सोनम गुंजाळ सुवर्णपदक, तर निसर्गा पाटील कांस्यपदक मिळवून महाविद्यालयाच्या यशात भर घातली. अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवडया स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विद्यापीठाच्या संघासाठी विविध खेळाडूंची निवड करण्यात आली.
पुरुष राखीव गटात एपीसाठी शिवराज भोसले (एमजीएम, नांदेड), फॉइलसाठी अंकुश सामुद्रे (डी. एन. पटेल, शहादा) आणि सेबरसाठी दत्ता कपाटे (एमजीएम, नांदेड) यांची निवड झाली. महिला राखीव गटात एपीसाठी विशाखा सुरवाडे (गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय), फॉइलसाठी रोशनी सूर्यवंशी आणि सेबरसाठी कृपा सूर्यवंशी (डी. एन. पटेल, शहादा) यांची निवड करण्यात आली. निवड झालेले पदकविजेते खेळाडू जम्मू-काश्मीर येथे आयोजित होणार्या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव आणि प्रा. नकुल गाडगे यांनी स्पर्धेच्या नियोजनात व आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजश्री यादव हिने केले.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्व पदकविजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









