जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ३ नोव्हेंबर रोजी भडगाव तालुक्याला क्षेत्रीय भेट देऊन जलसंधारण आणि पशुसंवर्धनविषयक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी जुवार्डी येथे जलतारा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर गुढे येथील सोजत गोट फार्मला भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यात आली.

जुवार्डी येथे जलतारा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी योजनेचे संस्थापक श्री. वायाळ उपस्थित होते. जलसंधारण, भूजल पातळीत वाढ आणि पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी जलतारा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ग्रामस्थांनी लोकसहभागातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जुवार्डी गावचे पी. ए. पाटील आणि रोजगार सेवक भूषण पाटील यांनी केले होते. यावेळी भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. बी. अंजने, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर करिश्मा नायर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत गुढे येथे उभारण्यात आलेल्या ५००+२५ सोजत गोट फार्मला भेट दिली. प्रकल्पाची सविस्तर माहिती घेत त्यांनी प्रक्षेत्रावरील चारा पिकांची लागवड आणि उत्पादनाची पाहणी केली. चारा पिकांच्या लागवडीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नायर यांनी तालुक्यातील चारा उपलब्धतेचाही आढावा घेतला. सध्या तालुक्यात पुरेसा चारा उपलब्ध असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना, चारा साक्षरता अभियान आणि रब्बी हंगामातील वैरण बियाणे वाटप याबाबत चर्चा करण्यात आली.
VB-G-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीसाठी मका, ज्वारी आणि बाजरी या वैरण बियाण्यांचा समावेश करण्याबाबतही विचारविनिमय झाला. या क्षेत्रीय भेटीदरम्यान सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप निकम, गुढे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा कापसे आणि अमडदे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गायकवाड उपस्थित होते.
जलसंधारण, लोकसहभागातून ग्रामविकास आणि पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.









