मुक्ताईनगर, प्रतिनिधी : सेवासंकल्प अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील रक्तकेंद्र विभागाच्या वतीने मुक्ताईनगर येथे स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३० रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले.

गरजू रुग्णांना वेळेवर सुरक्षित व पुरेसा रक्तसाठा उपलब्ध व्हावा, नागरिकांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी आणि नियमित रक्तदानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने शिबिर घेण्यात आले.

शिबिरात सहभागी रक्तदात्यांची नोंदणी करून प्राथमिक वैद्यकीय तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. पात्र रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदानानंतर रक्तदात्यांना विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा तसेच अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी रक्तदानाचे महत्त्व, रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि नियमित स्वैच्छिक रक्तदानामुळे समाजाला होणारा फायदा याबाबत रक्तदात्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होते, त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे स्वैच्छिक रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे अधिष्ठाता तसेच विकृतीशास्त्र विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रक्तकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, समाजसेवा अधीक्षक, ब्रदर व इतर कर्मचारी तसेच संबंधित संस्थेचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी सहकार्य केले.









