जळगाव, (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास त्यावर भरघोस परतावा देण्याचे अमिष दाखवून एका ५३ वर्षीय महिला वकिलाची तब्बल ७ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात बांभोरी येथील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल भास्कर पाटील, त्याची पत्नी जयश्री अतुल पाटील आणि आई सुरेखा भास्कर पाटील उर्फ प्रीती पाटील (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) अशी संशयितांची नावे आहेत. रामदास कॉलनीतील रहिवासी ॲड. तोषिता ज्ञानेश्वर भिरूड (वय ५३) यांना संशयितांनी गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

सुरुवातीला १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर काही दिवस परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ७ लाख रुपये उकळून परतावा व मुद्दल देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.










