जळगाव , प्रतिनिधी : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित २५ व्या रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि आधुनिक संगीताचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. नव्या पिढीला अभिजात संगीताची गोडी लागावी, या उद्देशाने प्रतिष्ठान गेल्या २५ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून यंदा जेन-झी पिढीसाठी ‘बॉलीवूड घराना’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

महोत्सवात तबला आणि पखवाज यांची जुगलबंदी जळगावकर रसिकांना अनुभवता येणार आहे. या सादरीकरणाला पं. अजय जोगळेकर हे संवादिनीवर साथसंगत करणार आहेत.

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली हे आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडले, तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि बासरीवर वरद कवठापूरकर साथ देतील. प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर या कार्यक्रमाचे निरूपण करणार आहेत.
नव्या पिढीला अभिजात संगीताची ओळख व्हावी आणि त्यांच्यात संगीताविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने अभिजीत पोहनकर आणि त्यांचे सहकारी ‘बॉलीवूड घराना’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाने २५ व्या रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे.
तरुणांसह ज्येष्ठ रसिकांसाठीही हा स्वरसोहळा पर्वणी ठरणार आहे. महोत्सवाच्या चारही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर करणार आहेत.
उपस्थित राहून या रौप्य महोत्सवी संगीत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयासह स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी कळविले आहे.
महोत्सवाच्या प्रवेशिकांसाठी सौ. दीपिका चांदोरकर यांच्याशी ९८२३०७७२७७ किंवा २२२७७२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
संपर्क कार्यालय : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, १०१, पार्क रॉयल, १३, वल्लभ नगर, रामानंद चर्चजवळ, जळगाव.








