जळगाव, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेत मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. महापालिका प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वंदे मातरम, राष्ट्रगीताच्या धून आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी महापालिका आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती होती.

विकासकामांत नागरिकांचा सहभाग आवश्यक : महापौर दीपमाला काळे
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “आज आपला देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या शिखरांवर पोहोचत आहे. या प्रगतीमध्ये आपल्या जळगाव शहराचा आणि नागरिकांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. महापौर म्हणून काम करताना जळगावला अधिक स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. मूलभूत सुविधांचा विस्तार, बळकट आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास यासाठी प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करत आहे.

पुढील विकासप्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही विकास नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शहराला देशातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत नेण्यासाठी प्रत्येक जळगावकराने आपल्या परिसराची नियमित स्वच्छता राखणे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावणे व ती जगवणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि कायद्याचे तंतोतंत पालन करणे असे विविध संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्याला भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रफुल्ल देवकर यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख, नगरसेवक आणि महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.









