जळगाव, (प्रतिनिधी) : मेहरूण तलाव परिसरातील सुबोनिया पार्क भागात कंबरेला गावठी पिस्तूल लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर खान जावेद खान (वय २५, रा. तांबापुरा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
परिसरात स्वतःचा वचक निर्माण करण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने समीर हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश ठाकरे, सुभाष साबळे आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन समीरला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते पिस्तूल तात्काळ जप्त करून समीरला अटक केली.
पोलीस कोठडीत असताना तपासाधिकारी विजयसिंग पाटील यांनी समीरची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने हे पिस्तूल जावेद शेख सलीम शेख (रा. दत्तनगर, मेहरूण) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. या माहितीवरून पोलिसांनी लागलीच संशयित पुरवठादार जावेदच्या घरावर छापा टाकला; मात्र पोलीस येण्यापूर्वीच तो फरार झाला. पोलीस सध्या फरार पुरवठादाराचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







