जळगाव, दि. ०७ ऑक्टोबर, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे रविवारी संध्याकाळी गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात ६ जण गंभीररित्या भाजले गेले असून दोन जण किरकोळ जखमी आहेत. कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. जखमींवर कासोदा, जळगावात उपचार सुरू आहेत.
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अनिल पुना मराठे हे शेतकरी गढी भागात परिवारासह राहतात. त्यांच्या घरासमोर नवरात्रोत्सवानिमित्त देवी बसवण्यात आली आहे. रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६. ३० वाजेच्या सुमारास त्यांनी गॅस सिलेंडरची हंडी संपल्याने नवीन हंडी आणली होती. ती त्यांनी बसवल्यानंतर त्यातून गॅस लिकेज होऊ लागला. त्यामुळे आग लागली.(केपी) घाबरून अनिल मराठे व त्यांचा परिवार बाहेर पळाला. आजूबाजूच्या ग्रामस्थांना माहिती कळाल्यावर त्यांना वाटले की, शेतकऱ्याच्या कपाशीला आग लागली आहे. त्यामुळे ते घराच्या दरवाजा जवळ गेले असता अचानक घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.
यात ग्रामस्थ जोरात फेकले गेले. यात आठ जण भाजले गेले. घटनेची माहिती कळताच इतर ग्रामस्थांनी त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यात ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४५), माधवराव शामराव गायकवाड (वय ३३) हे दोघे ४० टक्के भाजले गेले असून शुभम सुरेश खैरनार (वय २५), सुरेश अर्जुन खैरनार (वय ५०) या दोघांवर उपचार सुरू आहेत. (केपी)तर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात सागर कृष्णा सूर्यवंशी आणि आबा चव्हाण तर कासोदा येथील रुग्णालयात नगराज देवराम पाटील आणि घरमालक अनिल पुना मराठे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय राजपूत आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. कपाशीमुळे आग लागली असावी असे वाटल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थ घराजवळ गेले असता मोठा स्फोट झाला. त्यात आम्ही भाजलो गेलो, अशी माहिती जखमींनी दिली. घटनेमध्ये अनिल मराठे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी मागवण्यात आले होते.