चाळीसगाव, नांदगाव (प्रतिनिधी) : गिरणा खोरे अतीतुटीचे खोरे असताना हक्काचे नारपार योजनेतील पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. जलसमाधी आंदोलनानंतर आता शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जागृती करण्यासाठी मोठी चळवळ उभारण्याची गरज असून आपल्या सर्वांच्या सूचनेने कालबध्द कार्यक्रम आखला आहे. त्यावर काम करायचे आहे. यापुढे एक नेता, एक संघटना या माध्यमातून एकत्र येऊन गिरणा समृद्धीचा निर्धार केला आहे. ही लढाई निवडणूक पार करण्यासाठी नसून आमच्या हक्काच्या नार पार साठी असल्याने गावोगावी जावून नार पार ची लढाई आरपार लढू अशी गर्जना गिरणापुत्र माजी खा. उन्मेश पाटील यांनी केली आहे.
दरम्यान बुधवारी गिरणा डॅम येथे नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या निर्धार बैठकीत माजी खा. उन्मेश पाटील बोलत होते. सुरुवातीला गिरणा मातेचे जलपूजन करून गिरणामाईची खणा नारळाने ओटी भरण्यात आली. यावेळी खान्देशी हित संग्राम समिती कल्याण, गिरणा मण्याड बचाव समिती, पांझण डावा कालवा बचाव समिती, वांजुळ पाणी समिती, खान्देश जलपरिषद, जामदा कालवा समिती, मिशन ५०० कोटी लिटर या विविध संस्था , संघटनासह परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी,विविध जलसिंचन अभ्यासक आंदोलनकर्ते उपस्थित होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, खान्देशी हितसंग्रामचे भैय्यासाहेब पाटील, बापूसाहेब हटकर, वांजुळ पाणी संघर्ष समितीचे प्रा.के एन आहिरे, निखिल पवार, कळमदरीचे सरपंच शेखर पगार, गिरणा मन्याडचे विवेक रणदिवे, पांझण डावा कालवा समितीचे ऍड.राजेंद्र सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती महेंद्र पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, ज्येष्ठ नेते के आर पाटील, नरेश साळुंखे, डॉ. रविंद्र साळुंखे, गुगळवाड सरपंच आर डी निकम, बंडू पगार, दीपक पवार, भटक्या जाती सेना जिल्हाप्रमुख मारोती काळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सह्याद्री प्रतिष्ठान माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे, युवासेनेचे रवी चौधरी, प्रा.आर.एम.पाटील, चर्मकार समाज राज्याध्यक्ष मोतीलाल आहिरे, बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, धर्मा काळे, चांगदेव राठोड यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच विविध संघटनांचे, संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी, पत्रकार संघटना, आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्धार बैठकीत चतु:सूत्री कार्यक्रम..
राज्यातील कल्याण डोंबिवली ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक व सुरत येथील खान्देशी बहुल भागामध्ये जाऊन सभा घ्याव्यात. त्याचप्रमाणे केम ते गिरण्या डॅम तसेच गिरणा डॅम ते रामेश्वरम येथे ४० जलपरिषदा घेऊन नार पार योजनासाठी आंदोलन उभारणे. खान्देशातील ३२ विधानसभा मतदारसंघात जाऊन जनजागृती सभा घ्याव्यात. आपापल्या भागातील गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मधून दसऱ्यापर्यंत जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले.