जळगाव, दि.३१ (प्रतिनिधी) : आपल्या संस्कृती, सण यांचा वारसा, महत्त्व आजच्या शहरी भागामधील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या दृष्टीकोनातून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे शनिवारी बैल पोळा साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचे दैवत म्हणजे बैल. शेतकऱ्यांच्या या दैवताची पूजा ग्रामीण भागात बैल पोळा या सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतकरी साजरा करतात. शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे.
बैलांचे महत्त्व सांगून बैलपोळा साजरा करण्याचा उद्देश यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. मुख्याध्यापक नाईक यांच्या हस्ते शेतकरी जोडीचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माझा आवडता सण विद्यार्थ्यांना निबंध विचारला जात असतो. केवळ पुस्तक वाचन करून नव्हे तर प्रात्यक्षिक सणाचा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांनी निबंध लिहावा म्हणून वेगवेगळे सण शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत साजरे केले जात असतात असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.
यावेळी इयत्ता पहिली, दुसरी च्या विद्यार्थ्यांनी सर्जा राजाच्या गीतावर शेतकरी नृत्य सादर केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या कल्पकतेतून दरवर्षी बैलपोळा सण शाळेत साजरा केला जातो. सूत्रसंचालन सोनाली चौधरी यांनी केले. बैलपोळा कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांसह शाळेतील सर्व शिक्षकांनी घेतला.